भास्कर राऊत मारेगाव
रात्रीच्या वेळेस घरात नग्न अवस्थेत घुसून विनयभंगाच्या प्रयत्नात असलेल्या एका आरोपीविरुद्ध मारेगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला आहे. सदर घटना तालुक्यातील जानकाई पोड येथे दि. २७ डिसेंबरच्या रात्री अंदाजे ११ वाजताच्या दरम्यान घडली.
तालुक्यातील जानकाई पोड येथे एक मुलगी आपल्या वडील, आजी आणि बहिणीसोबत राहते. त्यांच्या घराचे काम सुरु असल्यामुळे बांधकामाचे बाजूला टिन आणि ताटव्याचे शेड करून राहते. रात्री नेहमीप्रमाणे जेवण करून वडील बाजूच्या गोठ्यात झोपायला गेले. आणि दोन मुली आपल्या आजीसोबत टिन आणि ताटव्याच्या शेडमध्ये झोपलेल्या होत्या. रात्री ११ च्या दरम्यान एक मुलगी लघुशंकेसाठी उठली. त्यावेळी वीज गेलेली होती. लघुशंका करून घरात येत असतांना अचानक वीज आली. त्यावेळी गावातीलच यशवंत रघु आत्राम वय २३ वर्षे हा नग्न अवस्थेत घरात घुसून तक्रारदार तसेच तिच्या बहिणीकडे वाईट उद्देशाने जात हात लावण्याचा प्रयत्न करीत असतांनाच सदर मुलगी जोरात ओरडली.
मुलीचा ओरडण्याचा आवाज ऐकताच वडील धावत तेथे आले तेव्हा आरोपी यशवंत रघु आत्राम हा तिथून पळाला. दि. २८ डिसेंबरला सदर मुलीने आपल्या आईवडीलासोबत मारेगाव पोलीस स्टेशन गाठत तक्रार दाखल केली. पोलिसांनी भा. न्या. सं. कलम ३३३, ७९ नुसार गुन्हा नोंद केला असून पुढील तपास ठाणेदार संजय सोळंखे यांच्या मार्गदर्शनाखाली मारेगाव पोलीस करीत आहे.
