ठेकेदाराचे दुर्लक्ष, अनेक वाहने पडत आहेत घसरून
भास्कर राऊत मारेगाव
तालुक्यातील हिवरा (मजरा) जवळील पूल हा घसरपट्टी बनलेला आहे. त्यामुळे या पुलावरून जाणारी अनेक दुचाकी वाहने घसरून पडत आहेत.या पुलाच्या कामाकडे ठेकेदाराचे दुर्लक्ष असून एखाद्याचा जीव गेल्यावरच या पुलाची दुरुस्ती करणार का असा प्रश्न नागरिकांकडून विचारल्या जात आहे.
मारेगाव तालुक्यात अनेक पुलांचे काम सुरू आहेत.त्यापैकी मार्डी ते हिवरा रस्त्यादरम्यान दोन पुलांची कामे करण्यात आली.त्यात हिवरा जवळील एका पुलाचे काम पूर्ण झाल्यात जमा आहे.तर दुसरा पूल पूर्णत्वास होण्याच्या मार्गावर आहे. या पुलावर माती मिश्रित मुरूम टाकला गेला असल्याने तेथे चिखल सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.याविषयी बांधकाम विभागाला निवेदन दिले असून त्यांचेही दुर्लक्ष आहे ठेकेदाराशी प्रत्यक्ष बोलणे झाले तरीही ठेकेदार तात्पुरती व्यवस्था करून देत नसल्याने नागरिकांचा जीव मात्र टांगणीला लागलेला आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस सुरू आहेत. परिसरामध्ये सध्या दररोज पाऊस पडत आहेत. त्यामुळे या माती मिश्रित असलेल्या मुरुमावर पाऊस पडल्याने तिथे चिखलाचे साम्राज्य निर्माण झालेले आहेत. पुलाचे काम पूर्ण झाले नसल्याने या पुलावरून वाहने काढत असताना ती घसरून पडण्याची भीती निर्माण झालेली आहेत. तर काही वाहनधारक आपले दुचाकी वाहन घेऊन तिथे पडल्याचे प्रत्यक्षदर्शी नागरिक सांगत आहेत. या पुलाच्या कामासंदर्भात गावातील काही नागरिकांनी ठेकेदाराला फोन करून याची प्रत्यक्ष माहिती दिली. परंतु आज करतो, उद्या करतो असे सांगत आठ दिवस निघून गेले तरीही ठेकेदार काम पूर्ण करायला तयार नाहीत. त्यामुळे एखाद्याचा जीव गेल्यावरच या पुलावर गिट्टी किंवा मुरूम टाकण्यात येणार का?असा प्रश्न या रस्त्याने येणारे जाणारे नागरिक विचारत आहे.
