करंजी-वडकी महामार्गांवरील घटना
भास्कर राऊत मारेगाव
दोन दुचाकींची समोरासमोर भीषण धडक होऊन यात दोन जण जागीच ठार झाले तर एक गंभीर जखमी झाला.सदर घटना दि. 3 जूनला सकाळी 10.30 ते 11 वाजताच्या दरम्यान करंजी ते वडकी महामार्गांवर अळणी फाट्याजवळ घडली.अंबादास बालाजी चाफले, वय 60 वर्षे, रा. चिंचमंडळ, ता. मारेगाव व सुरेश रामदास इंगळे, वय 30 वर्षे, रा.लोहारा ता. केळापूर असे मृत झालेल्या व्यक्तीची नावे आहे.
चिंचमंडळ येथील अंबादास चाफले यांची सावरखेडा येथे शेती आहे. ते आपल्या दुचाकीने सोनुर्ली फाट्यावरून सावरखेडा येथे जात होते. तरलोहारा येथील सुरेश इंगळे हे सावरखेडा मार्गे करंजी जात होते. उमरविहीर गावाजवळील सोनुर्ली फाट्यावर दोन्ही दुचाकी एकमेकांना धडकल्या. यात सुरेश इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अंबादास चाफले हे रोडवरच फेकल्या गेले.लगेच मागून एक दुचाकी चाफले यांच्या अंगावरून गेल्याने त्यांचाही मृत्यू झाला. तर नारायण सोनुले रा. सखी, ता. राळेगाव हे गंभीर जखमी झाले.घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी असलेल्या व्यक्तीला करंजी येथील रुग्णालय येथे भरती करण्यात आले. घटनेचा पुढील तपास वडकी पोलीस करीत आहे.
