बोदाडवासीयांचे रस्त्यासाठी निवेदन
भास्कर राऊत मारेगाव
चिखलाने माखलेल्या रस्त्यावर आम्ही चालायचं कसं, तुम्हीच सांगा साहेब पोरांना शिकवायचं कसं! ही आर्त हाक आहे तालुक्यातील बोदाड या छोट्याशा गावची. गावामध्ये जायला रस्ताच नसल्याने येथील नागरिकांची येण्याजाण्याची,आबालवृद्धांची आणि लहान मुलांना शाळेत शिकवण्याची मोठी पंचायत झालेली आहे. त्यामुळे तेथील नागरिकांनी आमच्या गावचा रस्ता त्वरित दुरुस्त करून द्यावा अशा प्रकारचे निवेदन संबंधित प्रशासनाला दिलेले आहे.

मारेगाव तालुक्यातील छोटसं गाव.गावाची लोकसंख्या 250 च्या जवळपास. लोकसंख्या कमी असल्याने या गावाकडे राजकारण्यांचे सहाजिकच दुर्लक्ष. लोकसंख्या कमी असल्याने मतदार कमी. त्यामुळे या गावाचा इतर कोणावरही फारसा प्रभाव पडत नाही.कारण मतदार कमी असल्यामुळे यांनी मतदान केले काय किंवा नाही केले काय यांचा इतर राजकारणी फारसा विचार करीत नव्हते. आणि म्हणूनच स्वातंत्र्याच्या 78 वर्षानंतरही या गावामध्ये जायला अजूनही पक्का रस्ता नाही हे त्याचेच द्योतक आहे. गावामध्ये जायला पक्का रस्ता नसल्याने अनेकांचे हाल होत आहेत. शाळेमध्ये जाणारी मुले चिखलामधून जावं लागतं म्हणून शाळेत जात नाही. त्यामुळे त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. तर म्हातारे लोक ते सुद्धा घसरून पडत आहेत.

या रस्त्याने पायदळ चालणेही कठीण होऊन गेले आहे. तर या रस्त्यावरून वाहन नेण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे या रस्त्याची त्वरित दुरुस्ती करून देण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन येथील नागरिकांनी गट ग्रामपंचायत बोदाड -केगाव तसेच गटविकास अधिकारी पंचायत समिती मारेगाव, आणि तहसीलदार मारेगाव यांना दिले. यावेळी अविनाश हरबडे,प्रशांत भंडारी,नंदकिशोर खामणकर,विजय मेश्राम,रोशन हरबडे,गजानन धोबे, राजेश ढेंगळे, सूरज हरबडे, अजय मडावी, श्रीकृष्ण मत्ते, गणेश सातपुते, विलास गमे, गजानन मडावी यांच्यासह अनेक नागरिक उपस्थित होते.
