आरक्षणामध्ये कही खुशी कही गम
भास्कर राऊत मारेगाव
मारेगाव तालुक्यातील 56 ग्रामपंचायतीचे आरक्षण दि. 24 एप्रिलला जाहीर करण्यात आले. तहसील कार्यालयामध्ये काढण्यात आलेली ही सोडत उपविभागीय अधिकारी यांच्या नियंत्रणात काढण्यात आली.या आरक्षण सोडतीचे अध्यक्ष तहसीलदार उत्तम निलावाड होते.सोडतीमध्ये अनेकांचा हिरमोड झाला तर अनेक गावांमध्ये आनंदाचे वातावरण असल्याचे दिसून येते.
सुरुवातीला पेसा ग्रामपंचायतची सोडत काढण्यात आली. यात पीसगाव,घोगुलदरा, बोरी (खुर्द), शिवनाळा, वरुड,गोधनी, अर्जुनी, डोल डोंगरगाव, हटवांजरी, गोंड बुरांडा, घोडदरा आणि बुरांडा (खडकी) या ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जमाती असे आरक्षण निघाले. तर नरसाळा,पहापळ, चिंचाळा,चिंचोनी बोटोनी, सगनापूर, वागदरा, जळका, मच्छिंद्रा,कान्हाळगाव, सराटी, खंडणी आणि म्हैसदोडका या गावांमध्ये अनुसूचित जमाती महिला अशी सोडत निघाली.
बिगर पेसा ग्रामपंचायतच्या सोडतीमध्ये वनोजादेवी ग्रामपंचायत अनुसूचित जाती,आकापुर आणि करणवाडी या ग्रामपंचायत अनुसूचित जमाती तर टाकळखेडा आणि गौराळा या ग्रामपंचायती अनुसूचित जमाती महिलांसाठी राखीव करण्यात आल्या. कोलगाव,चिंचमंडळ आणि मजरा या ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आल्या तर कोथुरला,खैरगाव (बुट्टी) आणि टाकळी या ग्रामपंचायती नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरिता आरक्षित करण्यात आल्या.
सावंगी,सिंधी, वेगाव, शिवणी (धोबे )कानडा, हिवरा(मजरा), नवरगाव, केगाव, देवाळा, इंदिराग्राम या ग्रामपंचायती सर्व साधारण आरक्षित करण्यात आल्या असून गाडेगाव, चोपण, दांडगाव, बोरी (बु.),आपटी, कोसारा, हिवरी, मार्डी, किन्हाळा,कुंभा आणि मंगरूळ या ग्रामपंचायती सर्व साधारण महिलांसाठी आरक्षित करण्यात आल्या.
अनेक ग्रामपंचायतीमध्ये इच्छुक गुडघ्याला बाशिंग बांधून सरपंच पदाच्या आरक्षणाची वाट बघत होते.परंतु काही ग्रामपंचायती या आरक्षित निघाल्या. तसेच काही ग्रामपंचायती या महिलांसाठी आरक्षित निघाल्याने अनेकांचा हिरमोड झाला. तालुक्यातील काही ग्रामपंचायतींमध्ये वारंवार महिलांचेच आरक्षण निघत असल्याची ओरड काही नागरिकांमधून ऐकायला मिळाली. तर काही ग्रामपंचायतीमध्ये अजूनही नामाप्र कसं निघालं नाही यावर चर्चा सुरू असल्याचे चित्र तालुक्यांमध्ये दिसत होते. एकंदरीतच या आरक्षणामुळे कही खुशी कही गम असे चित्र सर्वत्र तालुक्यामध्ये दिसून येत होते त्यामुळे जे आरक्षणाची वाट बघत गुडघ्याला बाशिंग बांधलेले होते त्यांची कमालीची निराशा झाली.
