भास्कर राऊत मारेगाव
सिलेंडरचा स्फ़ोट होऊन उडालेल्या भडक्यामध्ये संपूर्ण घर जळून खाक झाल्याची घटना तालुक्यातील गाडेगाव येथे घडली. घर जळालेल्या व्यक्तीचे नाव भारत झिबलू दाते असे आहे.
मारेगाव तालुक्यातील गाडेगाव येथील भारत दाते यांचे घरी इण्डेण कंपनीचे सिलेंडर होते. नेहमीप्रमाणे ते सकाळी सिलेंडर सुरु करायला गेले असता अचानक सिलेंडरचा स्फोट झाला. यात त्यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. घरातील सर्व धान्य जळून खाक झाले. कपडेलत्तेही संपूर्ण जळाले.भांडेही जळले. तसेच घरामध्ये असलेला टीव्ही, फ्रीझ फुटले. कुलर, फॅन हे सुद्धा जळून खाक झाले. घराचे छप्परही पूर्णपणे गायब झाले असून दाते यांचे मोठे नुकसान झालेले आहे.
घरात सिलेंडर फुटून आग लागली तेव्हा गावातील नागरिकांनी येऊन आग विझवली. तोपर्यंत सर्व जळून खाक झाले होते. घटनेची माहिती मिळताच तलाठी शिंदे यांनी घटनास्थळ गाठून घटनेची माहिती घेतली.
घरातील अन्नधान्य यांच्यासहित कपडेलत्तेही जळाल्याने आता खायचं काय आणि लावायचं काय असा मोठा प्रश्न उभा राहिला आहे. तसेच ऐन हिवाळ्यात घरावरील छप्परही गेल्याने दाते कुटुंबियांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे.
