आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांचे सत्कार प्रसंगी उत्तर
वणी येथील जैताई मंदिरात पार पडला सत्कार समारंभ
भास्कर राऊत मारेगाव
शिक्षकांच्या हातून सत्कार होणे हे मी माझे सौभाग्य समजतो.असा प्रसंग क्वचितच जीवनामध्ये येत असतो. हा सत्कार माझा नसून आमच्या सरकारचा आहे असे उद्गार आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी काढले. शिक्षक समन्वय संघ वणी, मारेगाव,झरीतर्फे त्यांचा सत्कार दि. 15 ऑक्टोबरला वणी येथील जैताई मंदिर येथे करण्यात आला.
यावेळी मंचावर शिक्षक समन्वय संघाचे राज्य संघटक पुरुषोत्तम येरेकर, विभागीय सचिव श्रीकांत लाकडे, वणी तालुकाध्यक्ष अनंत आंबेकर, मारेगाव तालुका अध्यक्ष दिलीप पाटील, झरी जामणी तालुका अध्यक्ष विनोद जेणेकर, वणी,मारेगाव,झरी तालुका समन्वय संघाचे अध्यक्ष प्रवीण परेकर उपस्थित होते. मुंबई येथे शिक्षक संघटनांचे अनुदानात टप्पा वाढीसाठी आंदोलन सुरू असताना वणी विधानसभा क्षेत्रातील आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी शिक्षकांना सर्वतोपरी सेवा उपलब्ध करून देत सहकार्य केले.
आमदार निवास येथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी वारंवार बोलणी करून शिक्षकांच्या समस्या सोडवण्यासाठी सहकार्य केले. त्याबद्दल शिक्षक समन्वय संघातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी सत्काराला उत्तर देताना आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार म्हणाले, विनाअनुदानित शाळेतील शिक्षकांनी मागील अनेक वर्षांपासून अनुदानासाठी संघर्ष केला.पगारच मिळत नसल्याने अनेक शिक्षकांचे जीवन उद्ध्वस्त झाले.

अनेकांचे लग्न सुद्धा मोडले.अशा बिकट परिस्थितीमध्ये काम करणाऱ्या शिक्षकांनी नुकतेच कुटुंबाच्या दूर राहत 56 दिवस मुंबई येथे आंदोलन केले. शिक्षण क्षेत्र पवित्र असलं पाहिजे.त्यांच्यावर आंदोलन करण्याची वेळ येऊ नये. मी तुमच्या सेवेस पडलो हे मी माझे सौभाग्य समजतो. शिक्षकांच्या पगारापेक्षा शिक्षक हे पद मोठे आहे.

मी शिक्षक झालो नाही याची मला खंत वाटते.मी सर्वांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल. एवढे दिवस शिक्षकांना संघर्ष करण्याची वेळ येणार नाही यासाठीही प्रयत्न करणार आहो. कार्यक्रमाचे संचालन प्रदीप बोरकुटे यांनी केले. प्रास्ताविक योगेश वेले तर आभार प्रदर्शन मुकेश महाडुळे यांनी केले.कार्यक्रमाला परिसरातील शिक्षक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
