आत्महत्येचे कारण अस्पष्ट
मारेगाव प्रतिनिधी धनराज खंडारे
मारेगाव तालुक्यातील मजरा येथील एका अविवाहित युवकाने आपल्या राहत्या घरीच कचऱ्यावर फवारायचे औषध घेतले.ही घटना दिनांक 14 ऑक्टोबर 2024 ला दुपारच्या सुमारास घडली. त्याच्यावर चंद्रपूर येथे उपचार सुरू होते. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.विष घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव अमर विजय किनाके वय अंदाजे 28 वर्ष, राहणार मजरा, तालुका मारेगाव असे आहे.
अमर हा आपल्या आई सोबत मजरा येथे मामाच्या गावाला राहायचा. त्याचे वडील मारेगाव तालुक्यातीलच मुक्टा येथे राहतात.दिनांक 14 ऑक्टोबरला अमर हा गावामध्ये असताना त्याने कचऱ्याचे औषध घेतले. सुरुवातीला ही घटना कोणाच्याही लक्षात आली नाही.
परंतु नंतर काही वेळाने त्याची तब्येत खराब होत चालल्याने घरच्यांच्या ही गोष्ट लक्षात आल्यानंतर त्याला मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे हलवण्यात आले. तिथे त्याचेवर प्राथमिक उपचार करून त्याला पुढील उपचारासाठी चंद्रपूर येथे पाठवण्यात आले. परंतु चंद्रपूर येथे त्याच्यावर उपचार सुरू असतानाच त्याची प्राणज्योत मालवली.त्याचे पश्चात आई वडील आणि एक विवाहित बहीण आहे.
