भास्कर राऊत मारेगाव
बोरी येथील एका व्यक्तीने पाणीपुरवठ्याच्या विहिरीमध्ये आत्महत्या केली. ही बाब पाणीपुरवठा करणाऱ्या कर्मचाऱ्याला माहिती नसल्याने त्याने त्या दिवशी प्रेत असलेल्या विहिरीतूनच गावाला पाणीपुरवठा केला. त्यामुळे प्रेत असलेल्या विहिरीचे पाणी बोरीवासीयांना प्यावे लागले.
बोरी येथील प्रीतम सुरेश सिडाम याने मंगळवार दिनांक 15 ऑक्टोबरला गावातीलच पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीमध्ये उडी टाकून आत्महत्या केली होती. प्रीतम हा रोज मजुरी सोबत बँड वाजवण्याच्या कामावर सुद्धा जात होता. त्याच्यामुळे घरच्यांना तो गावात नाही तर तो बँड वाजवायला गेला असावा असे वाटले.त्यामुळे त्या प्रीतमची कोणीही चौकशी केली नव्हती. बुधवार दिनांक 16 ऑक्टोबरला पाणीपुरवठा कर्मचारी हा गावाला पाणीपुरवठा करण्यासाठी त्या विहिरीजवळ गेला. विहिरीमध्ये डोकावून पाहिले. परंतु त्याला तिथे कोणीही दिसून आले नाही. आणि त्याने पाण्याची मोटर सुरू करून गावातील नागरिकांना पाणीपुरवठा केला.
तसेच दिनांक 17 ऑक्टोबरला सुद्धा पहाटेच गावाला पाणीपुरवठा केला. ही बाब कोणालाही माहीत नसल्याने गावातील लोकांनी सुद्धा त्याच विहिरीचे पाणी प्यायले. दुपारच्या सुमारास गावातील एक व्यक्ती त्या विहिरीजवळून जात असताना त्याने सहज विहिरीत डोकावून पाहीले असता त्याला एक प्रेत विहिरीमध्ये तरंगत असताना दिसले. गावाला पाणीपुरवठा करणारी एकच विहीर असल्यामुळे आता गावात पाण्याचा पुरवठा कसा करणार? असा प्रश्न पडलेला आहे.
========================= गावामध्ये सध्या एक बोर उपलब्ध आहे. त्या बोअरद्वारे गावातील मंदिरापर्यंत पाणी आणून नागरिकांच्या पाण्याची तात्पुरती व्यवस्था करण्यात येत आहे. पाणीपुरवठ्याच्या विहिरीतील पाण्याचा उपसा सुरू आहे. क्रेन वाल्याला बोलवून त्याचेकडून विहिरीची स्वच्छता करण्यात येईल. दोन-तीनदा पाण्याचा उपसा करण्यात येणार आहे. त्यानंतर आरोग्य विभागाकडून पाणी पिण्यायोग्य आहे की नाही हे बघूनच गावाला पाण्याचा पुरवठा करण्यात येईल.
सरपंच प्रवीण नान्हे बोरी गदाजी
