भास्कर राऊत मारेगाव
तालुक्यातील नवरगाव येथील २१ वर्षीय तरुणीने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवार दि. २३ नोव्हेंबर रोजी सायंकाळी उघडकीस आली.खुशबू सुभाष मोहुर्ले रा. नवरगाव (धरण), असे घरात गळफास लावून आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.
खुशबू ही वणीला स्पर्धा परीक्षेची तयारी करीत होती. त्यासाठी ती वणी येथे खोली करून राहत होती. निवडणुकीमुळे तिच्या क्लासेसला सुट्टी असल्यामुळे ती नवरगावला आलेली होती.नेहमीप्रमाणे खुशबूची आई सकाळी पिदूरकर यांच्या शेतामध्ये गेली होती.सायंकाळी कामावरून घरी परतली असता दरवाजा टेकवून होता. आईने दरवाजा उघडून बघितले असता मधल्या खोलीमध्ये मुलगी स्कार्फच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. ही दुःखद घटना नागरिकांना कळताच गावकरी घटनास्थळी दाखल झाले.युवतीला रुग्णालयात हलविले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषीत केले.
खुशबू ही वणी तालुक्यातील एका अकॅडमी प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेत असल्याचे समजते.सोबतच खुशबूचे BCA सुरु होते अशीही माहिती होती.मृतक खुशबूच्या पश्चात आई व दोन विवाहित बहिणी असून वडिलांचे निधन झाले आहे. सध्या खुशबूच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट असून पुढील तपास मारेगाव पोलीस करित आहे.
शिक्षण घेणारी मुले का जात आहे आत्महत्येच्या आहारी?
मारेगाव तालुक्यामध्ये शेतकरी आत्महत्यांच्या घटनेने कळस गाठलेला आहे. दर दोन दिवसाआड एक आत्महत्या हे मारेगावचे गणित ठरलेले आहे. शेतकरी आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत असतानाच आता शाळकरी मुलांच्या त्यातही स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या मुलांच्या आत्महत्या होत असल्याने ही बाब खरोखरच चिंतनिय आहे.
