भास्कर राऊत मारेगाव
25 वर्षाचा विजयाचा दुष्काळ संपवित शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार संजय देरकर यांनी अखेर वणी विधानसभा मतदारसंघात विजयश्री खेचून आणली. त्यांनी भारतीय जनता पक्षाचे विद्यमान आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांचा 15560 मतांनी पराभव केला.
वणी विधानसभा मतदारसंघात सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या प्रकारची चुरस पाहायला मिळालेली होती. सुरुवातीला तिकीट कोणत्या पक्षाला जाईल, त्यानंतर उमेदवार कोण असेल? यावरून रंगलेली ही लढत अखेर शिवसेनेच्या उबाठा गटाचे संजय देरकर यांना तिकीट जाहीर झाली. त्यावरून मोठ्या प्रमाणात नाराजी नाट्य रंगले. तिकिटाच्या रेसमध्ये असलेले संजय खाडे यांनी तिकीट न मिळाल्यामुळे बंडोखोरी केली. तर शिवसेनेचे माजी आमदार विश्वास नांदेकर यांनीही संजय खाडे यांना पाठिंबा जाहीर केला.
संजय देरकर यांना उमेदवारी मिळाल्यामुळे रंगतदार लढत होईल अशी शक्यता वाटत असतानाच शिवसेना आणि काँग्रेस मधील बंडखोरीमुळे ही लढत एकतर्फीच होते की काय?अशी शक्यता निर्माण झाली होती. अखेर 94618 मते घेत 79 058 मते घेणाऱ्या संजीव रेड्डी बोदकुरवार यांच्यावर 15560 मतांनी विजय मिळविला.
मनसेनेही गाठला 20 हजाराचा पल्ला
मनसेच्या राजू उंबरकर यांनीही 21 हजार 977 मते घेत मागील निवडणुकीत मिळालेल्या मतांपेक्षा जास्त मते घेतली. तर काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष राहिलेल्या संजय खाडे यांना 7540 मते मिळाली.
देरकर यांना मिळाली होती पहिल्या फेरीत 1 हजार मतांची आघाडी
संजय देरकर यांना पहिल्या फेरीत 1000 मतांची आघाडी मिळालेली होती. प्रत्येक फेरी गणिक ही आघाडी वाढत गेली.अखेर काही फेऱ्यांमध्ये ही आघाडी कमी झालेली होती. आता काय निकाल लागेल याची उत्सुकता वणी मतदार संघातील संपूर्ण जनतेला लागली होती. परंतु अखेर संजय देरकर यांनी ही आघाडी वाढवत 15,560 मतांनी विजयश्री खेचून आणत आमदार होण्याचा बहूमान मिळविला.
1999 मध्ये लढवली होती पहिली विधानसभेची निवडणूक
नुकतेच निवडून आलेले शिवसेना उबाठा गटाचे संजय देरकर यांनी विधानसभेची पहिली निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून 1999 ला लढवली होती. त्यानंतर 2009,2014 आणि 2019 ला त्यांनी ही निवडणूक लढवली. प्रत्येक वेळी त्यांना अपयश मिळाले. परंतु यावेळी त्यांनी विजयश्री खेचून आणली.
