कठीण परिस्थितीवर मात करीत मिळवले यश
भास्कर राऊत मारेगाव
जिल्हा परिषद शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलेला आणि ग्रामीण भागातील अल्पभूधारक शेतकऱ्याच्या मुलाने मोठी झेप घेत एम.पी.एस.सी. परीक्षेत जीएसटी निरीक्षक म्हणून यश मिळवलेले आहे. खुशाल अनिल झोटिंग रा. चिंचमंडळ ता. मारेगाव असे एम. पी. एस. सी. परीक्षेच्या माध्यमातून जीएसटी निरीक्षक म्हणून यश मिळवलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे.

खुशाल झोटिंग याचे इयत्ता पहिली ते सातवी पर्यंत शिक्षण जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चिंचमंडळ येथे झाले. त्यानंतर आठवी ते बारावी पर्यंत शिक्षण मारेगाव – वणी येथे झाले. त्यानंतर यवतमाळ येथील वसंतराव नाईक कॉलेजमध्ये बीएससी ऍग्री केले. त्यानंतर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास खुशालने पूर्ण केला. याच वेळेस 2023 मध्ये ग्रुप बी आणि ग्रुप सी ची एम.पी.एस.सी.ची जाहिरात निघाली. त्याच वेळी एमपीएससीची तयारी करत असताना खुशाल ने जीएसटी निरीक्षक म्हणून परीक्षा दिली आणि त्यात त्याला यश मिळाले.

खुशालचे वडील श्री. अनिल झोटिंग यांचेकडे फक्त पाच एकर शेती आहे. या पाच एकर शेतीमध्ये आपल्या दोन मुले,दोन मुली यांचा सांभाळ करताना त्यांनी आपल्या दोन्ही मुलांना योग्य संस्कार आणि शिक्षण देत वाढवले. वडिलांच्या कष्टाचे चीज करत कुशलने आपल्या अभ्यासाच्या आणि मेहनतीच्या जोरावर आपल्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला. त्याच्या या यशाने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.
