तालुक्यातील सिंधी, पिसगाव, कुंभा,चिंचाळा ते मंगरूळ परिसरात जाणवले धक्के
भास्कर राऊत मारेगाव
रात्रीची वेळ होती, 10.30 ते 11च्या दरम्यान ची वेळ. सर्वजण आपापल्या घरी शांततेने झोपलेले होते. अशातच एकाएकी जोराचा धक्का जाणवला. अनेकांना काय झाले कळलेच नाही आणि भीतीने आपल्या घराच्या बाहेर निघाले. ज्यांचे टीन आणि कौलांचे घर होते, त्यांच्या टीनांचा आवाज आला. काहींच्या घरी भांडे पडल्याचा आवाज झाला. नागरिकांना वाटले कदाचित ब्लास्टिंगचा वगैरे आवाज असेल.परंतु नंतर कळले की हा भूकंपाचा सौम्य धक्का होता.त्यामुळे नागरिक भीतीने घराच्या बाहेर पडले.काहींनी तर अख्खी रात्र जागून काढल्याची चर्चा तालुक्यातील पीसगाव, कुंभा, सिंधी मांगरूळ,चिंचाळा या गावांमध्ये घडली.
मारेगाव तालुक्याला लागून भांडेवाडा ही भूमिगत खान आहे. तिथे अनेकदा कोळसा काढण्याचे वेळी ब्लास्टिंग केली जाते. ब्लास्टिंगचा आवाज आणि धक्का लोकांना परिचयाचा आहे. परंतु दिनांक 14 फेब्रुवारी 2025 च्या रात्री अंदाजे 10.30 च्या सुमारास रात्री सगळे लोक रात्रीच्या वेळेस आपल्या घरी शांतपणे झोपलेले असताना अचानक जोराचा आवाज आला. यात ज्यांचे घर टीनेचे होते त्यांच्या टीनांचा आवाज आला. तर काही लोकांच्या घरची भांडी सुद्धा पडल्याचे सांगण्यात येत आहे. प्रशासकीय स्तरावरून हा धक्का भूकंपाचा की कशाचा याची अजूनही पुष्टी केलेली नसली तरी नागरिकांच्या मनामध्ये मात्र भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
सुरुवातीला हा धक्का ब्लास्टिंगचा असावा अशीही अनेकांना शंका आली. त्यामुळे नागरिकांनी जवळपास ब्लास्टिंगचे काम कोठे सुरू आहेत का याची चौकशी केली. परंतु त्यांना कोठेही ब्लास्टिंग सुरू असल्याचे आढळून आले नाही. याविषयी मारेगाव तहसीलचे तहसीलदार श्री. उत्तम निलावाड यांच्याशी संपर्क केला असता त्यांनीही अशा प्रकारचे मला कॉल आले. आणि मी पीसगाव, सिंधी,कुंभा या गावांना भेटी देऊन चौकशी केली. तसेच याविषयी वरिष्ठ कार्यालयाला माहिती सुद्धा दिली असल्याचे सांगितले.
