दांडगाव येथील जुन्या रिठावर वाघाचे ठसे व दर्शन
भास्कर राऊत मारेगाव
मारेगाव तालुक्यात पुन्हा वाघोबाचे आगमन झाले असून दांडगाव जवळ असलेल्या जुन्या रिठावर वाघाचे ठसे आढळून आले.यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नदी काठावर असलेल्या शेतकऱ्यांना आता शेतात जायचे कसे आणि ओलीतातील पीक काढायचे कसे असा यक्षप्रश्न पडलेला आहे.तर दांडगाव मार्गे मार्डा डॅमवरून वरोरा जाणेयेणे करणाऱ्या नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
मारेगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या काठावर असलेल्या दांडगाव जुना रिठावर आज सकाळी विशाल सुभाष भुसारी या शेतकऱ्याला वाघ दिसला. त्याने होमगार्ड नरेंद्र गजानन चिंचोलकर यांना गावात येऊन वाघ असल्याचे सांगितले. त्या दोघांनी जावून वाघाच्या पायाचे ठसे मोबाईल मध्ये टिपले. वाघ जुन्या गावात असल्याने गावकऱ्यांचा चांगलाच थरकाप उडाला आहे. वरोरा जाण्याच्या मार्गांवर हा दांडगाव येथील जुना रिठ असल्याने या रस्त्याने रहदारी मोठ्या प्रमाणात असते. याच मार्गांवर वाघाचे अस्तित्व असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.गावकऱ्यांनी लागलीच ती माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. वनविभागाची चमू त्या परिसरात वाघाचा शोध घेण्याकरिता पोहचली आहेत.
=======================
वनविभागाची चमू दांडगाव परिसरात पोहचले असून प्रथमदर्शी वाघाचेच ठसे असल्याचे निष्पन्न होत आहे. परिसरात वनविभागाच्या वतिने कॅमेरे लावले जात आहे. मात्र नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे. वरिष्ठाना कळवून वाघाचा शोध घेतला जात आहे.
शंकर हटकर
वनपरीक्षेत्र अधिकारी मारेगाव
