निमित्त होते भागवत महायज्ञ कथेचे
भास्कर राऊत मारेगाव
मजरा (मार्डी )येथील सुपुत्र दोन निवृत्त अधिकारी यांचा मजरा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करण्यात आला. निमित्त होते मजरा येथे सुरू असलेल्या भागवत महायज्ञ ज्ञान कथेचे. गावातीलच नागरिकांकडून झालेल्या भावनिक सत्कारामुळे दोन्हीही निवृत्त अधिकारी भारावून गेले होते.

मारेगाव तालुक्यातील मजरा येथे दिनांक 16 मार्च ते 23 मार्च पर्यंत भागवत महायज्ञ कथेचे आयोजन करण्यात आले होते. या भागवत कथेच्या शेवटच्या दिवशी दि. 23 मार्चला रविवारी मजरा येथील निवृत्त लेफ्टनंट कर्नल हरिदास संभाजी बोबडे तथा निवृत्त पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मण गणपत राजगडकर यांचा हृद्य सत्कार करण्यात आला.

हरिदास बोबडे हे मुंबई येथे लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत होते. 2015 ला ते सेवेतून निवृत्त झाले. तर लक्ष्मण राजगडकर हे कळंब येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते. ते 2024 ला निवृत्त झाले. एका मोठ्या पदावर जाऊन गावाचं नाव उज्वल केलं त्याबद्दल मजरा ग्रामवासीयांच्यावतीने मजरा येथील दोन्ही सुपुत्रांचा शाल, श्रीफळ तसेच सन्मानचिन्ह आणि ग्रामगीता देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी गावातील अनेक नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
