भास्कर राऊत मारेगाव
काल दि. 18 नोव्हेंबरला प्रचारतोफा थंडावल्या. आता प्रत्यक्ष गृहभेटी आणि दारोदारी प्रचार सुरु झालेला आहे. या दोन दिवसामध्येच कार्यकर्त्यांचा खरा कस लागणार असून कोण कोणासोबत आणि कोणाला कोठून आघाडी राहील याचे पुसटसे चित्र स्पष्ट होणार आहे.
निवडणुकीचा प्रत्यक्ष प्रचार संपला. कानाभोवती घोंगावणारे आवाजाचे वादळ काल सायंकाळी 5 वाजता शमले. किंकाळणाऱ्या आवाजापासून आणि दिवसभर चालणाऱ्या लाऊड स्पीकरपासून नागरिकांची सुटका झालेली आहे. आता खरा प्रचार सुरु झालेला आहे.नेते आता मतदाराच्या दारी जाऊन प्रचार करणार आहे. मतदारांना वेगवेगळी आश्वासने मिळणार आहे. तुम्ही बिनधास्त राहा, मी आहोच असे आपुलकीचे शब्दही ऐकायला मिळणार आहे. कधी भावनिक तर कधी आर्थिक संबंधही या रात्री जोपासल्या जाणार आहे. यात अनेक जण आपला स्वार्थ साधणार आहे.
यात कधी आठवण न येणाऱ्या कार्यकर्त्यांची आठवण या उमेदवार असलेल्या नेत्यांना येणार आहे. अरे, तुझ्याशिवाय हे काम कोणीच करू शकत नाही अशा प्रकारचे चढवणीचे पाणीही कार्यकर्त्यांना दिले जाणार आहे. वर्षभर किंवा मतदान येत पर्यंत ज्यांची कधी आठवण येत नव्हती आता त्यांनाही मोठे सुगीचे दिवस किंवा त्यांची खरी वेळ आलेली आहे. काय लागते ते सांग, असे आश्वासक शब्दही कार्यकर्त्यांच्या कानावर पडतांना दिसत आहे.
एकंदरीत काय तर जे अडगळीत पडलेले होते त्यांना केवळ मतदान काढण्यासाठी मानाचे स्थान दिल्या जाईल.या रात्री कोण कोणासोबत आहे हे कळणार असून यावरच उमेदवारांच्या विजयाचे गणीत ठरणार आहे.
