भास्कर राऊत मारेगाव
शेतामधील कापूस वेचून घरी परतत असलेल्या महिलेच्या अंगावर वीज कोसळून मृत्यू झाला. तर सोबत असलेली महिला गंभीर जखमी झाली. सदर घटना दि. २७ डिसेंबरला सायंकाळी ५ ते ५.३०च्या दरम्यान मारेगाव तालुक्यातील केगांव (गोधणी) शिवारात घडली. वीज पडून मृत्यू झालेल्या महिलेचे नाव मेघा गणपत पानघाटे, वय 45 रा. केगांव (गोधणी )असे होते.
केगांव येथील गणपत पानघाटे यांचेकडे स्वतःची ४ एकर शेती असल्याची माहिती आहे. एवढ्याशा शेतीमध्ये आपले भगत नाही म्हणून ते काही शेती ठेक्याने करायचे. गोधणी शिवारात केलेल्या ठेक्याच्या शेतामध्ये पानघाटे यांनी कपाशी पेरलेली आहे.त्या शेतामध्ये गावातीलच लक्ष्मी वासुदेव तोडासे या महिलेसोबत मेघा गणपत पानघाटे कापूस वेचायला गेल्या होत्या. कापूस वेचून परत येत असतांना मधातच विजेचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली. पाऊस लागल्याने दोघीही रस्त्यामध्ये असलेल्या एका बंड्याजवळ थांबल्या. पाऊस कमी झाल्याने पुन्हा त्या घराच्या रस्त्याने लागल्या. परंतु नियतीला हे मान्य नव्हते. आणि त्या बंड्याच्या बाहेर येऊन थोड्या दूर जात नाही तोच मेघा पानघाटे यांच्या अंगावर वीज कोसळली.
वीज कोसळ्ल्याचा आवाज येताच शेजारच्या शेतामध्ये असलेल्या लोकांनी लगेच या दोघींनाही मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. परंतु डॉक्टरांनी मेघा पानघाटे यांना मृत घोषित केले.तर लक्ष्मी तोडासे या गंभीर असल्याने त्यांचेवर मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे उपचार सुरु आहे.मेघा पानघाटे यांच्या पश्चात पती, विवाहित मुलगी, मुलगा असा आप्त परिवार आहे.या घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
