सुरज पत्रकार राळेगाव
महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अनेक बेरोजगार युवकांना प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देत विविध शासकीय विभागात रुजू केले. विविध विभागामध्ये अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हे युवा प्रशिक्षणार्थी आपले कार्य उत्तम पार पाडत आहेत. परंतु या युवा प्रशिक्षणार्थींचा कार्यकाळ फक्त सहा महिन्यांचा असून हा कार्यकाळ वाढवून देण्यात यावा व पुन्हा सेवेची संधी देण्यात यावी अशा प्रकारच्या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी गटविकास अधिकारी केशव पवार यांच्यामार्फत माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि कौशल्य रोजगार उद्योजकता आणि नवोपक्रम मंत्री श्री मंगल प्रभात लोढा यांना दिलेले आहे.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी जाहीर केल्यानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी ज्या स्थापनेमध्ये आहेत तिथेच, महाराष्ट्र शासन कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग शासन निर्णय क्रमांक संकीर्ण- 2024 /प्र. क्र. 90/व्यशि -3 यामधील मुद्दा क्रमांक 4.5 या योजनेच्या प्रशिक्षणानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग/आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवाराची इच्छा असल्यास त्यांना रोजगार देण्याचे दृष्टीने संबंधितआस्थापना निर्णय घेऊ शकतील.
या मुद्द्याला अनुसरून आस्थापनाने युवा प्रशिक्षणार्थींना नियमित करावे. त्यांचा कालावधी वाढविण्याचा व वेतन वाढीचा विचार करावा.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मिशन 100 दिवस जाहीर केले.त्यामध्ये दीड लाख कर्मचाऱ्यांची भरती सुरू करण्याचे आदेश दिले.तसेच कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण तातडीने घेऊन त्यांना त्यांच्या जिल्ह्यात पदस्थापना द्या असे आदेश दिले.यामध्ये युवा कार्य प्रशिक्षणार्थींना सुद्धा सामावून घेण्यात यावे, अशा प्रकारची मागणी या युवा प्रशिक्षणार्थींनी केलेली आहे.
महाराष्ट्र शासनाने अनेक योजना जाहीर केलेल्या आहे.यात लाडकी बहीण योजना,वयश्री योजना, एसटी प्रवास सवलत, शेतकरी आत्मसन्मान व इतर लाभाची योजना सुरू केलेल्या आहेत.या योजनांना कोणताही कालावधी निश्चित केला नाही. फक्त मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी याच योजनेला कालावधी हा फक्त सहा महिन्यांचा आहे. ही सहा महिन्याची अट काढून आम्हालाही सेवेत समाविष्ट करावे अशा प्रकारची विनंती मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी केलेली आहे.
अशा प्रलंबित असणाऱ्या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थींच्या मागण्या सरकारने मंजूर कराव्यात व बेरोजगार होणाऱ्या युवकांना नवीन सुरुवात व भविष्याची दिशा निश्चित करण्याची संधी द्यावी अशा प्रकारची मागणी ही या युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी केलेली आहे.यावेळी राळेगाव तालुक्यातील अनेक युवा प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
