शेतातील बोरीच्या झाडालाच घेतला गळफास
भास्कर राऊत मारेगाव
शेतात असलेल्या बोरीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील हिवरा येथे घडली. प्रवीण सुदाम ताजने वय 35 वर्ष असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या.शेतकऱ्याचे नाव आहे.
प्रवीण ताजनेच्या नावाने दांडगाव शिवारामध्ये 88 आर शेती होती.तसेच वडिलांच्या नावाने सुद्धा चार एकर शेती आहे. तो स्वतःच्या आणि वडिलांच्या शेतीवर आपली आणि कुटुंबाची उपजीविका करीत होता.
मागील दोन ते तीन वर्षापासून सतत पडत असलेला ओला दुष्काळ, होत असलेले कमी उत्पन्न आणि लाल्या रोगामुळे कमी झालेले उत्पन्न यामुळे प्रवीण हा सतत चिंतेमध्ये होता.प्रवीण हा नेहमीप्रमाणे दांडगाव शिवारात असलेल्या शेतीमध्ये गेला होता. सायंकाळ झाली तरी तो घरी परत आला नाही.
घरच्यांना वाटले की तो गावामध्ये कुठेतरी बसलेला असावा. पण रात्री उशीर व्हायला लागला तरी तो परत न आल्याने घरच्या मंडळींनी त्याची सगळीकडे शोधाशोध केली. तो कुठेही दिसून न आल्याने शेवटी घरच्यांनी शेतामध्ये जाऊन बघितले असता शेतात असलेल्या बोरीच्या झाडाला प्रवीण गळफास घेऊन लटकलेला अवस्थेत दिसला.
प्रवीण ने गळफास घेतल्याची वार्ता गावात पसरताचं गावातील अनेक जणांनी प्रवीणच्या शेताकडे धाव घेतली. हिवरा येथील पोलीस पाटलांनी मारेगाव पोलीस स्टेशनला फोन करून घटनेची सविस्तर हकिकत कळविली.
पोलीस घटनास्थळी दाखल होत त्यांनी मृतदेहाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीकरिता मारेगाव येथे हलवीला.प्रवीणच्या पश्चात म्हातारे आईवडील, पत्नी आणि एक मुलगी असा आप्त परिवार आहे. सदर घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
