अनेकांनी सांगितले जीवनातील किस्से
भास्कर राऊत मारेगाव
1984-85ला दहावीत असणाऱ्या विद्यार्थ्यांचा तब्बल 40 वर्षानंतर एकत्र येत स्नेहमीलनाचा कार्यक्रम रोज रविवार दि. 9 मार्चला मारेगाव तालुक्यातील कुंभा या शाळेत पार पडला. विशेष म्हणजे या स्नेहमीलन कार्यक्रमकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून तसेच महाराष्ट्राच्या बाहेरूनही मित्र मंडळी आल्याने या स्नेहमीलन कार्यक्रमाला चांगलीच रंगत आली होती.

भारत विद्या मंदिर कुंभा येथे सन 1984-85 मध्ये 10 वीमध्ये शिक्षण घेणाऱ्या या वर्गमित्रांची तब्बल 40 वर्षानंतर भेट झाल्याने सर्वांनी आपला जीवन परिचय देत विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम घेतले. यावेळी या सर्व वर्गमित्रांनी एक अनोखा कार्यक्रम घेतला. आपल्या वर्गमित्रांसोबतच आपल्याला त्या काळी शिकविणाऱ्या शिक्षकांविषयी आदर दाखवत त्यांनाही मार्गदर्शक म्हणून बोलावले होते. यावेळी घेण्यात आलेल्या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी मुख्याध्यापक बाबाराव ठाकरे, प्रमुख पाहुणे म्हणून बाळकृष्ण राजूरकर, डी. झेड. गोलर, एस. एम. महाजन,डी. के. खंगार, क्षीरसागर, व्ही. एम. इंगोले, ए. आर. कुटे, वाल्मिकराव ढोरे, बबनराव गोखरे, गोदावरी कुटे, कुसुम चौधरी,वनिता केळकर उपस्थित होत्या.

यावेळी मार्गदर्शक सर्व शिक्षकांनी माजी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. आणि आपल्या भावना व्यक्त केल्या. आजपर्यंत जुन्या मित्रांचे स्नेहमीलन होतांना बघत आलो. परंतु आपल्या जुन्या शिक्षकांना त्यात कधीही आमंत्रित केल्या जात नव्हते. हा एक आदर्श पायंडा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रभूराज पाटील यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. सुनीता बुटे यांच्या मन भावना या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. ज्यांचे पती मृत्यू पावले त्या सर्व माजी विद्यार्थिनी, उपस्थित कर्मचारी यांच्या पत्नीचाही शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी अनेक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांनी डीजेच्या तालावर सुंदर नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे संचालन नत्थू चौधरी यांनी, प्रास्ताविक अनंता शिवरकर यांनी तर आभार प्रदर्शन विवेक देशपांडे यांनी केले.
स्नेहमीलन कार्यक्रमात नरेंद्र गायकवाड, अंबादास चहानकर,ओमप्रकाश पिंपळकर, सुहास उदकवार, बंडू दरबेश वार , गणपत गंधारे, नरेंद्र वर्मा, ( छ्तीसगड ) किसन पडोळे, उत्तम बलकी, अशोक बुरडकर, नरेंद्र सुराणा, शेखर महाजन तसेच त्यावेळच्या विद्यार्थिनी यांनी विशेष परिश्रम घेतले. वेळ झाली तरी अनेकांचा पाय मात्र शाळेच्या बाहेर निघत नव्हता.
