गजानन चंदनखेडे यांचे नगरपंचायतला निवेदन
भास्कर राऊत मारेगाव
कराचा भरणा केल्यानंतर नगरपंचायत मारेगावकडून मूळ पावती देण्याऐवजी कार्बन पावती नागरिकांना दिल्या जात आहे.या कार्बन पावतीमुळे कार्यालयीन कामकाजात अडथळा निर्माण होत आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे ही कार्बन पावती न देता मूळ पावतीच देण्यात यावी अन्यथा नगरपंचायत कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते गजानन चंदनकडे यांनी दिला आहे.
मारेगाव तालुका हा आदिवासी बहुल तालुका तसेच शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुका म्हणून नावारूपास आलेला आहे.या मारेगाव तालुक्यामध्ये अनेक समस्या “आ” वासून उभ्या आहेत. येथील नगरपंचायत मध्ये खाबुगिरीचा प्रचंड बोलबाला असून अफलातून कारभाराला ऊत आलेला आहे, अशा प्रकारचा आरोपही गजानन चंदनखेडे यांनी केलेला आहे.
गजानन चंदनखेडे यांनी 6 फेब्रुवारी 2025 ला कराचा भरणा केला. कर भरणा केल्यानंतर त्यांना मूळ पावती ऐवजी कार्बन पावती दिली.मागील अनेक वर्षापासून हीच पावती देत असल्याचे नगरपंचायतने त्यांना सांगितले. परंतु कार्बन पावतीमुळे अनेक कार्यालयीन कामांमध्ये अडथळा येत असतो, त्यामुळे मला मूळ पावती देण्यात यावी अशी मागणी गजानन चंदनखेडे यांनी केली होती. परंतु त्यांनी आपबीती कथन करून देखील कार्यालयाने त्यांना मूळ पावती दिलेली नाही. अधिकाऱ्यांचा कर्मचाऱ्यांवर वचक नसल्यामुळे लिपिकांना अच्छे दिन आले आहे. नगरपंचायत कार्यालयात मुख्याधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद असल्याचाही त्यांनी निवेदनाद्वारे आरोप केलेला आहे.नगरपंचायतच्या कारभारात सात दिवसात सुधारणा करण्यात यावी व कराचा भरणा केल्यानंतर नागरिकांना मूळ पावती त्वरित प्रदान करण्यात यावी. अन्यथा नगरपंचायत कार्यालयासमोर अर्धनग्न आंदोलन करण्यात येईल असा इशारा गजानन चंदनखेडे यांनी दिला.
