भास्कर राऊत मारेगाव
मार्डा डॅम येथील पुलावरील बाजूची सुरक्षारक्षक असलेली कठडीच नसल्याने पुलावरील धोका वाढलेला आहे. या पुलावरून जाणेयेणे करणे धोक्याचे झाले असून याकडे संबंधीत विभागाचे दुर्लक्ष दिसून येत आहे. त्यामुळे एखादी अनुचित घटना घडल्यावरच याकडे लक्ष देणार का? असा प्रश्न नागरिक विचारत आहे.
यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्याला जोडणाऱ्या वर्धा नदीवर दांडगाव – मुक्टा तसेच मार्डा यांच्यादरम्यान वर्धा नदीवर पाणी अडवून डॅम बांधण्यात आला आहे. या डॅमचे पाणी चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा येथे असलेल्या वर्धा पॉवरप्लांट तसेच जी. एम. आर. या दोन प्लॅन्ट साठी येथील पाण्याचा वापर केला जातो.या डॅमचा यवतमाळ जिल्ह्याला कोणताही फायदा होत नाही. उलट नुकसान मात्र यवतमाळ जिल्ह्याचेच जास्त होत असते. यात जनावरे तर कधी काही व्यक्ती डुबून मरण पावल्याच्याही घटना घडल्या आहेत. तसेच पुराच्या पाण्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत असल्याची नित्याचीच बाब बनली आहे.
मारेगाव तालुक्यातील मार्डी कुंभा परिसराला मोठी बाजारपेठ म्हणून वरोरा ही जवळ पडते. तसेच वर्धा नदीवरील डॅममुळे वरोरा जाणे सोयीचे झाले आहे.
मागील वर्षी झालेल्या मुसळधार पावसाने या पुलावर असलेले लोखंडी कठडे पडलेले होते. त्यामुळे काही काळ लोखंडी कठड्या ऐवजी दोर बांधलेला होता. आता तोही काढून टाकण्यात आलेला आहे.पुलाचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले होते. सध्या पुलावर मोठे खड्डेसुद्धा पडलेले आहे. आवश्यकता नसतांना या पुलावर गतिरोधकही देण्यात आले आहे. एका बाजूची कठडीच नसल्याने दोन्ही बाजूनी एकाच वेळी वाहने आली तर कधी बॅलेन्स जाऊन याठिकाणी मोठा अपघात सुद्धा घडू शकतो. संबंधीत विभागाला हे सगळं माहित असूनही याकडे गांभीर्याने बघितले जात नाही. कदाचित याठिकाणी एखादी जीवितहानी घडल्यानंतरच उपाययोजना केली जाणार आहे का?असे नागरिक बोलत असल्याचे दिसून येते.
