भास्कर राऊत मारेगाव
काँग्रेस जिवंत राहिली पाहिजे यासाठीच माझी उमेदवारी आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या प्रेम आणि आग्रहाखातर मी माझी उमेदवारी दाखल केली आहे.काँग्रेसचा परंपरागत असलेला गड हा ढासळू न देण्यासाठी मी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. जनतेचे प्रेम आणि सहकार्य यांच्या भरोशावरच मी या मतदार संघातून विजयाची शिट्टी फुकणार असल्याचेही संजय खाडे यांनी वणी येथील वसंत जिनिंगमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केले. यावेळी माजी आमदार विश्वास नांदेकर, माजी जी. प. उपाध्यक्ष नरेंद्र ठाकरे,मारेगाव कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती गौरीशंकर खुराणा, सुनील वरारकर, पुरुषोत्तम आवारी, प्रशांत गोहकार,तेजराज बोढे, शंकर वऱ्हाटे,चंद्रकांत घुगुल, संजय आवारी, प्रसाद ठाकरे, यादवराव काळे, तुळशीराम कुमरे उपस्थित होते.
संजय खाडे यांनी अपक्ष उमेदवारी कायम ठेवत विधानसभा निवडणुकीत रंगत जरी आणली असली तरी त्यांच्या उमेदवारीने महाविकास आघाडीमध्ये मात्र बिघाडी झालेली आहे.
संजय खाडे म्हणाले की मागील २६ वर्षांपासून काँग्रेस पक्षाचे काम करीत आहो.मागील काही वर्षांपासून वणी विधानसभा क्षेत्रातील अनेक गावे पिंजून काढली. जनहित केंद्राच्या माध्यमातून जनतेची कामे केली. सर्वसामान्य कुटुंब, शेतकरी, महिला, बेरोजगार युवकांच्या रोजगाराचा प्रश्न, नागरिकांच्या आरोग्यविषयक समस्या, शिक्षण विषयक समस्या सर्वतोपरी सोडवण्याला मी प्राधान्य देणार आहो.
वणी विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाला सुटण्यासाठी जोरकस प्रयत्न केले. तिकिटाच्या रेसमध्ये मी सर्वात वर होतो. परंतु हा मतदारसंघ उबाठा या पक्षाकडे गेला आणि आमची काँग्रेस मित्र मंडळ नाराज झाली. परिसरातून वणी मतदारसंघातून काँग्रेस पक्ष नष्ट होऊ नये, काँग्रेस पक्षाचे चिन्ह जरी गायब झाले तरी काँग्रेस पक्ष हा रसातळाला जाऊ नये, म्हणून मी काँग्रेस पक्षाच्या आणि मित्रमंडळींच्या तसेच मित्र पक्षाच्या आग्रहाखातर, सर्वांच्या प्रेमाखातर माझी उमेदवारी दाखल केलेली आहे.आणि या मतदारसंघातून मी शिटी जोरदार फुंकणार आहे,, असा निर्धारही संजय खाडे यांनी केला.
माजी आमदार विश्वास नांदेकर आणि नरेंद्र ठाकरे यांनीही केले विजयाचे आवाहन
या पत्रकार परिषदेवेळी माजी आमदार विश्वास नांदेकर आणि माजी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नरेंद्र ठाकरे यांनीही संजय खाडे यांच्या विजयाचा निर्धार केला. विकास पुरुष म्हणून सर्व मतदारांनी संजय खाडे यांचा प्रचार करून विजयी करण्याचे या दोन्ही नेत्यांनी आवाहन केले.
