भास्कर राऊत मारेगाव
चिंचमंडळ येथे वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५६ व्या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे. दिनांक १४, १५ व १६ जानेवारी २०२५ असे तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमांमध्ये महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण प्रशांत महाराज ठाकरे यांच्या जाहीर कीर्तनाच्या कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आलेले आहे.
मारेगाव तालुक्यातील चिंचमंडळ येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यस्मरण सोहळ्याचा कार्यक्रम दरवर्षी आयोजित करण्यात येतो. यावर्षीही या पुण्यस्मरण सोहळ्याचे आयोजन दिनांक १४ जानेवारीपासून करण्यात आलेले आहे.तीन दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमामध्ये पहाटे चार ते पाच वाजता ग्रामसभा, पाच ते साडेपाच घटस्थापना, साडेपाच ते साडेसहा सामुदायिक ध्यान,दुपारी तीन ते पाच वाजता ग्रामगीता संगीतमय प्रबोधन, सायंकाळी सहा ते सात वाजता सामुदायिक प्रार्थना, रात्री साडेआठ वाजता जाहीर कीर्तन अशा प्रकारे कार्यक्रमाची दैनंदिनी आखण्यात आलेली आहे. १४ जानेवारीला हरिभक्त परायण श्री प्रतीक महाराज बारी गुरुकुंज आश्रम आश्रम मोझरी यांचे कीर्तन असून दिनांक १५जानेवारीला रात्री साडेआठ वाजता हरिभक्त परायण श्री प्रशांत महाराज ठाकरे, राष्ट्रीय कीर्तनकार व संच अकोला यांचे जाहीर कीर्तन होणार आहे. तर दिनांक १६ जानेवारीला दुपारी बारा ते तीन वाजता काल्याचे किर्तन हरिभक्त परायण श्री प्रवीण महाराज काटकर,भागवताचार्य राळेगाव यांचे कडून होणार आहे.
या पुण्यस्मरण सोहळ्यामध्ये कर्मवीर भाऊराव पाटील हायस्कूल तथा जिल्हा परिषद शाळा चिंचमंडळ यांचे लेझीम पथक सुद्धा आपली कला दाखवणार आहेत. या कार्यक्रमाचा गावातील सर्व नागरिक तसेच परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या प्रमाणात आस्वाद घ्यावा असे आवाहन श्री स्वामी सुब्रमण्यम गुरुदेव सेवा मंडळ तथा समस्त चिंचमंडळ ग्रामवासी यांनी केलेले आहे
