भैय्याजी कनाके मारेगाव
जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीच मी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेलो आहे. मी काँग्रेसचा खंदा कार्यकर्ता आहे. मागील 30 वर्षापासून मी काँग्रेससाठी काम करतो आहे. काँग्रेसच्याच मतदारसंघात काँग्रेसला तिकीट नाकारल्याने मी जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी उभा राहिलेलो आहे. असे उद्गार संजय खाडे यांनी मार्डी येथे झालेल्या सभेदरम्यान काढले.
या सभेमध्ये बोलताना माजी आमदार विश्वास नांदेकर म्हणाले की, मागील दोन वर्षापासून संजय खाडे यांनी मतदार संघाच्या विकासासाठी आणि जनतेसाठी वेगवेगळे उपक्रम राबवले. यात अभ्यासिका केंद्र सुरू केले. फिरते जनहित केंद्र तर संपूर्ण मतदारसंघांमध्ये चर्चेचा विषय ठरलेला आहेत. त्यामुळे आम्ही तन मन आणि धनाने संजय खाडे यांच्यासोबत या निवडणुकीमध्ये असल्याचे त्यांनी जाहीर केले.
या सभेमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नरेंद्र ठाकरे म्हणाले की, वणी मतदार संघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे.काँग्रेसच्या चिन्हाला तिकीट नाकारल्याने काँग्रेसी विचाराचा माणूस या मतदारसंघामध्ये उभा असावा म्हणून आम्ही संजय खाडे यांच्यासोबत उभे आहोत. संजय खाडे यांच्या कुटुंबीयांनी आणि त्यांनी आम्हाला केलेल्या सहकार्याच्या परतफेडसाठी आणि काँग्रेसची वाताहत थांबावी यासाठी आम्ही त्यांच्यासोबत इमाने इतबारे आहोत, यात कोणीही संशय घेऊ नये.असेही नरेंद्र ठाकरे आपल्या भाषणांमध्ये म्हणाले.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती गौरीशंकर खुराना, संजय आवारी, विधाते यांच्यासह अनेक कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.संजय खाडे यांची मिरवणूक वाजत गाजत मार्डी येथून काढण्यात आली.
