दोन मंडळामध्ये हाणामारी, परस्पर विरोधात तक्रारी दाखल
मास्टर तेजस वरोरा
दुर्गादेवी विसर्जनादरम्यान ढोलताशे व डीजेच्या तालावर आनंद व्यक्त करीत असतांना दोन मंडळामध्ये हाणामारी झाली.पोलिसांनी लाठीमार केल्याने पुढील अनर्थ टळला.या घटनेमध्ये दहा जण जखमी झाले असून दोन्ही मंडळानी परस्पर विरोधात तक्रार दाखल केली आहे.
सविस्तर वृत्त असे की,
वरोरा तालुक्यातील टेमुर्डा येथे दि. १४ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजता ढोलताशे आणि डीजेच्या तालावर दुर्गादेवीचे विसर्जन सुरु होते.या मिरवणुकीत युवक,युवती,महिला व पुरुष बेधुंदपणे नृत्य करीत होते.
यावेळी हुडकी मंडळातील एक युवक नृत्य सुरु असतांना खाली कोसळला.यावरून दोन मंडळामध्ये चांगलाच वाद झाला.यामध्ये कोणतेही मंडळ समझोत्याची भूमिका घेत नव्हते.शेवटी वाद वाढत गेला. हुडकी आणि टेमुर्डा या दोन मंडळामध्ये तुफान हाणामारी झाली.
हा वाद थांबायचे नाव घेत नसल्याने काही व्यक्तींनी वरोरा पोलीस ठाण्यात फोन केला. रात्री १ वाजता दंगा नियंत्रक पथक टेमुर्डा येथे दाखल झाले. सोबतच पोलिसांची अतिरिक्त कुमक बोलावण्यात आली.
वरोरा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नासरे, बिट जमादार विकी करपे घटनास्थळी दाखल झाले. जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीमार करून परिस्थिती आटोक्यात आणली.
यावेळी अमित डाहुले २५, गोपाल तुमराम २६, महेश गायकवाड २४, सौरभ झिले २५, देविदास टेकाम ४०, आनंद कश्यप ४२ हे जखमी झाले असून इतर ६ जण किरकोळ जखमी झालेले आहे. सदर घटनेचा तपास वरोरा पोलीस करीत आहे.
