मारेगाव येथे शिक्षक प्रशिक्षणादरम्यान केले वक्तव्य
भास्कर राऊत मारेगाव
विद्यार्थ्यांसाठी आपण आहोत हे शिक्षकांनी लक्षात ठेऊन विद्यार्थी घडविण्यासाठी प्रयत्नरत असावे. कारण विद्यार्थीच नसेल तर शाळा ओस पडेल.आणि शिक्षक म्हणून आपल्याला स्थान राहणार नाही. तसेच विद्यार्थी योग्य घडावा यासाठी शासनातर्फे वारंवार बदलानुसार प्रशिक्षण दिले जात असते. या प्रशिक्षणाचा फायदा आपण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी करावा असे प्रतिपादन नागपूर विभागाचे शिक्षक आमदार श्री. सुधाकर अडबाले यांनी केले. ते मारेगाव येथे दि. २४ फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षणाच्या दुसऱ्या टप्प्याच्या प्रशिक्षणामध्ये बोलत होते.

ते पुढे म्हणाले की,शिक्षक हा समाजाचा कणा आहे. या शिक्षकांना बदलत्या काळानुसार, बदलत्या अभ्यासक्रमानुसार प्रशिक्षणाची गरज असते.परंतु प्रशिक्षण हे उन्हाळ्यात किंवा सुट्टीच्या काळात असावे. कारण विद्यार्थ्यांसाठी वर्षभर मेहनत घेत असतांना त्यांना या प्रशिक्षण काळात वाऱ्यावर सोडावे लागते.

नवीन शैक्षणिक धोरण हे २०२० पासून सुरु झाले आहे. विद्यार्थी घडावा, उच्च विद्याविभूषित व्हावा, यासाठी शासन प्रशिक्षणाच्या माध्यमातून शिक्षकांना प्रशिक्षित करीत आहेत. मराठी भाषेला नुकताच केंद्र सरकारने अभिजात भाषेचा दर्जा दिलेला आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा देत असताना मराठी माध्यमाच्या शाळा टिकल्या पाहिजे याकडे सुद्धा सरकारने लक्ष दिले पाहिजे.शिक्षकांच्या वेगवेगळ्या समस्या संदर्भात बोलताना आमदार सुधाकर अडबाले म्हणाले की, ज्या शाळा अंशतः अनुदानित आहे त्यांना वाढीव टप्प्यासाठी प्रयत्न करेल. तसेच स्वयं अर्थ सहाय्यित शाळा देऊ नये. कारण यामुळे अनेक शाळा ओस पडताना दिसत आहेत.शिक्षक कमी, नवीन शिक्षक भरती बंद असल्याने शिक्षक कमी झालेले आहेत.त्यामुळे शिक्षणाचा दर्जा सुद्धा घसरलेला आहे.सध्या महाराष्ट्र देशात शिक्षणाच्या बाबतीत सातव्या नंबर वर आलेला आहे.
शिक्षकांना अशैक्षणिक कामे देऊ नये. blo चे काम शिक्षकांना देण्यात येऊ नये.यावेळी अनेक शिक्षकांनी त्यांच्या असलेल्या समस्या आमदार अडबाले यांच्यासमोर कथन केल्या. या समस्या सोडविण्यासाठी नक्कीच प्रयत्न करेल असे आश्वासन दिले.यावेळी मंचावर संकेत ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य भारत निखाडे,मुख्याध्यापक संघटनेचे मारेगाव तालुका अध्यक्ष संजय देवाळकर, सचिव सुनील आष्टकार, मुख्याध्यापक भारत गारघाटे उपस्थित होते.यावेळी मार्गदर्शक शिक्षक म्हणून सतिश गौरकार,रवि मडावी, सोनाली जेनेकर,जयश्री राजूरकर,दयानंद पुडके,गुणवंत उपरे,निलेश आत्राम,विलास मेश्राम,समता मेश्राम उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सोनाली जेणेकर यांनी तर आभार सतीश गौरकार यांनी मानले.आमदार सुधाकर अडबाले यांचे मुख्याध्यापक संघटना मारेगाव यांचेतर्फे स्वागत करण्यात आले.प्रशिक्षणाला सर्व शिक्षक उपस्थित होते.
