पांडवांचे निवासस्थान होते पांडव देवी मंदिर
भास्कर राऊत मारेगाव
महाशिवरात्रीच्या निमित्ताने विदर्भात प्रसिद्ध असलेल्या पांडव देवी मंदिरामध्ये यात्रा महोत्सवाला सुरुवात झालेली आहे.दि. २५ फेब्रुवारी पासुन सुरु झालेली ही यात्रा तीन दिवस चालणार आहे. यात्रेनिमित्ताने येथे भावीकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी असून जनसागर शिवशंकराच्या भक्तीमय वातावरणात लीन झालेले असतात. या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्तसुद्धा दिसून येतो.

तालुक्यात ऐतिहासिक वैभव असलेली आणि पांडवाच्या वास्तव्याने पवित्र झालेले पांडवदेवी मंदीर वणी – यवतमाळ या राज्य मार्गावर जळका फाटा येथून दक्षिणेला एक किमी अंतरावर आहे. या ठिकाणी मंदिराच्या गाभाऱ्यात शंकराची पिंड असून हे भव्य कोरीव हेमाडपंथी मंदीर आहे. येथे अतिशय देखण्या शिल्पकला असल्याने विदर्भातीलच नाही तर पर राज्यातील भाविकही दर्शनाला या ठिकाणी शिवरात्री महिन्याला येतात. त्यामुळे या मंदिरला एक वेगळे वैभव लाभले आहे.

मंदिराच्या सभोवताल मोठमोठी वृक्ष आहे . मंदिराला लागूनच एक झूळझूळ वाहणारा ओढा आहे. काही अंतरावर एक विहीर आहे.त्यामुळे परिसर हिरवागार असून मनमोहक आहे.
हे मंदीर पूर्वाभिमुख आहे. व्हरांडा, सभामंडप आणि गर्भगृह, असे या मंदिराचे स्वरूप आहे. या व्यतिरिक्त मंदिराला उत्तर-दक्षिण असे दोन मार्ग दिले आहे. हे मंदीर स्थापत्यकलेच्या दृष्टीने विशेष उल्लेखनीय असून मंदीर बांधकामासाठी कोरीव शिळा वापरल्या आहेत.मंदीर बांधकामासाठी वापरलेल्या शिळावर द्वारपाल, कुबेर, गजलक्ष्मी, मुष्ठीयोद्धे, स्त्रीशिल्पे, सिंह, शिवपार्वती, गणेश आदी चित्रांची रेलचेल आहे.या कोरीव चित्रावरून त्या काळातील सामाजिक स्थितीचे दर्शन होते. पौराणिक, ऐतिहासिक महत्त्व असलेले हे मंदीर राष्ट्रकुट काळात ( इ. स. पूर्व 757 ते 954) निर्मिती झालेला प्राचीन ऐतिहासिक ठेवा असल्याचे बोलल्या जाते.
मात्र मंदीर परिसरात सोयीसुविधांचा अभाव आहे. मंदीराचे खांब काही बाजूने झुकले असून मंदीर मोडकळीस येत आहे.त्यामुळे लोकप्रतिनिधी यांनी लक्ष देण्याची गरज आहे.हा आपला ऐतिहासिक ठेवा आहे, त्याची जतन करणं आपल्या कर्तव्य आहे. शासनाने या मंदिर परिसरात पर्यटनासारख्या सुविधा उपलब्ध केल्यास निश्चितच या परिसरातील एक भव्य दिव्य ऐतिहासिक वारसा लाभलेले स्थळ उभे राहील.
शिवरात्री, गायगोधन ला भरते भव्य यात्रा. (बॉक्स)
राज्यासह लगतच्या राज्यातील भावीक श्रद्धेने मोठ्या संख्येने या मंदिरात दर्शनाला येत असतात.महाशिवारात्री आणि गायगोधन या दिवशी इथे भव्य यात्रा भरते. पंचक्रोशीतील भाविकांची मोठी गर्दी उसळते. प्रशासनाचे वतीने कायदा व सुव्यवस्था उत्तम सांभाळली जाते.
या ठिकाणाला विशेष महत्व. (बॉक्स)
भगवान श्रीकृष्णानी पाच पांडवाना माता कुंतीसह भुयारी मार्गाने माहूर वरून इथे पाठविले. अज्ञात वासातील काही काळ पांडवानी या ठिकाणी घालवला. म्हणून या ठिकाणाला पांडवदेवी मंदीर नाव पडले. या मंदिराचा भुयारी मार्ग माहूर मंदिरात पोचत असल्याची आख्यायिका सांगितली जाते.
