स्मशानभूमीचा पत्ता नाही परंतु रस्ता मात्र तयार
भास्कर राऊत मारेगाव
चणे आहे पण दात नाही आणि दात आहे पण चणे नाही असाच काहीसा प्रकार मारेगाव तालुक्यात दिसून येत आहे. मारेगाव तालुक्यातील एका गावामध्ये स्मशानभूमीचा पत्ता नाही. परंतु त्या स्मशानभूमीच्या जागेपर्यंत जायला मात्र सिमेंटचा पक्का रस्ता बनल्याने ओसाड गावाला सिमेंट रस्त्याचा मुलामा अशाच प्रकारची काहीशी परिस्थिती आहे.


म्हणतात ना, सरणावर जाता जाता एवढेच मला कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते…. माणसाला जीवन जगत असताना नाना प्रकारच्या यातना भोगाव्या लागतात. परंतु त्याच्या मृत्यूनंतर त्याची अंतिम यात्रा सुखद व्हावी म्हणून अनेक गावांमध्ये स्मशानभूमीचे शेड बांधण्यात आलेले आहे. तर तालुक्यातील काही गावांमध्ये अजूनही स्मशानभूमी दिसून येत नाही.
पावसाळ्यामध्ये जर या गावातील व्यक्ती मरण पावली तर त्याची अंतिम बिदाई कुठे करायची? हाच मोठा यक्ष प्रश्न उभा राहतो. तर काही गावांमध्ये भर पावसात सुद्धा वर पाल किंवा प्लास्टिक चुमडीचा गोणा वरून लावून प्रेत जाळल्याचे प्रकार सुद्धा घडल्याच्या बातम्या वृत्तपत्रांमध्ये प्रकाशित झालेल्या आहे.

ही घटना आहे मारेगाव तालुक्यातील वर्धा नदीच्या काठापासून काही अंतरावर असलेल्या छोट्याशा दापोरा या गावची.अशी एवढी विदारक परिस्थिती असतानाही अनेक गावांमध्ये स्मशानभूमी पर्यंत जायला रस्ता तयार करण्यात आला. परंतु अजूनही स्मशानभूमीचे शेड मात्र तयार नसल्याने तोही एक आश्चर्याचा विषय बनलेला आहे.
मागील वर्षी पावसाळ्यामध्ये या गावातील एका व्यक्तीचे निधन झाले होते.गावात स्मशानभूमीचे शेड नसल्याने त्या व्यक्तीला जाळण्याचे वेळी वरून प्लॅस्टिकच्या गोणा पांघरून प्रेत जाळण्यात आले. एवढी विदारक परिस्थिती गावातील जनतेला,नेत्यांना आणि प्रशासनाला माहीत असताना सुद्धा प्रशासनाने स्मशान शेड ऐवजी रस्ता बांधून गाववाल्यांची एक प्रकारे थट्टाच केलेली आहे.
