सर्वाधिकारी श्री लक्ष्मणरावजी गमे
मार्डी येथील ग्रामजयंती कार्यक्रमात व्यक्त केले विचार
भास्कर राऊत मारेगाव
राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार हे जगाला प्रेरणा देणारे आहे. जगाला समता, बंधुता आणि न्याय शिकवणारी ग्रामगीता हा पवित्र ग्रंथ आहे. राष्ट्रसंतांचे विचार हे घराघरात पोहोचले पाहिजेत.यासाठीच अशा कार्यक्रमांचे आयोजन करणे गरजेचे असते असे उद्गार गुरुकुंज मोझरी सेवा संस्थानचे सर्वाधिकारी श्री लक्ष्मणरावजी गमे यांनी काढले. ते मार्डी येथे ग्राम जयंती महोत्सव व प्रचारक मार्गदर्शन मेळावा कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

यावेळी उद्घाटक म्हणून यवतमाळ जिल्हा सेवा अधिकारी पद्माकर ठाकरे,प्रमुख अतिथी म्हणून मारोतराव ठेंगणे, यवतमाळ जिल्हा प्रचार प्रमुख, ग्रामगीताचार्य तथा केंद्रीय कार्यकारणी सदस्य तथा यवतमाळ जिल्हा महिला प्रचार प्रमुख विजया दहेकर, डॉ.ज्ञानेश्वर मुडे निर्वाचन अधिकारी श्रीक्षेत्र गुरुकुंज मोझरी, दिलीप डाखरे ग्रामगीताचार्य, तथा वणी तालुका सेवा अधिकारी, श्रीकांत चिकटे बाभूळगाव, श्री पचारे सर, ज्ञानेश्वर कडूकर, पुरुषोत्तम भोयर उपस्थित होते.

सर्वाधिकारी लक्ष्मणराव गमे यांनी या कार्यक्रमाची मुक्त कंठाने प्रशंसा केली.75 वर्षावरील गुरुदेव उपासकांचा सत्कार करून मारेगाव तालुका गुरुदेव सेवा मंडळाने एक चांगला व प्रशंसनीय उपक्रम राबवला. नियोजनबद्ध व भविष्याचा वेध घेऊन घेण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये कार्यक्रम संपेपर्यंत कोणीही उठले नव्हते,हे या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य सांगत त्यांनी असा कार्यक्रम मी आजपर्यंत माझ्या जीवनामध्ये कुठेही बघितला नाही हे सुद्धा आवर्जून सांगितले. त्यांनी गुरुकुंज मोझरी आश्रमाच्या विविध विभागाची माहिती उपस्थितांना दिली. तसेच अन्नदान विभागात सहकार्य करावे असे आवाहन सुद्धा त्यांनी उपासकांना केले. प्रचारकांना मार्गदर्शन करताना त्यांनी प्रचारकाने गुरुकुंजच्या सर्व विभागाची माहिती ग्रामीण भागात पोहोचवून जास्तीत जास्त उपासक व सामुदायिक प्रार्थना मंडळ सुरू करावी असा मौलिक सल्ला सुद्धा त्यांनी दिला.

यावेळी सर्व मार्गदर्शकांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शुभम धानोरकर, प्रास्ताविक सुनील देऊळकर तर आभार प्रदर्शन संतोष लिहितकर यांनी केले. कार्यक्रमाला मारेगाव तालुका तसेच बाहेरील तालुक्यातील अनेक गुरुदेव उपासक उपस्थित होते.
