दोन जखमी एक गंभीर
भैय्याजी कनाके मारेगाव
वणी येथे लग्नानिमित्त जात असलेल्या युवकाचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले. दुचाकी समोरून येणाऱ्या दुचाकीसोबत ट्रकला जाऊन धडकल्याने दुचाकी चालक गंभीर जखमी झाल्याची घटना वणी मारेगाव राज्य महामार्गावर दि. 4 मार्चला सकाळी 11 वाजता घडली. अपघातात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव प्रथमेश भास्कर बोढाले वय 22 असे असून यात पोलीस जमादार भालचंद्र मांडवकर हे सुद्धा जखमी झाले.
यवतमाळ तालुक्यातील हातगाव पिंपरी येथील प्रथमेश बोढाले हे वणी येथे नातेवाईकाच्या लग्नानिमित्त आपल्या दुचाकीने जात होते. मारेगाव वरून ते वणी येथे जात असतांना गौराळा फाट्याजवळ प्रथमेश बोढाले याचे नियंत्रण सुटले. यात तो वणीवरून मारेगाव येथे आपल्या कर्तव्यावर येत असलेल्या मारेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस जमादार भालचंद्र मांडवकर यांना धडकत तो समोरून येणाऱ्या ट्रकला धडकला.
ही धडक एवढी जबर होती की, प्रथमेशच्या डोक्याला गंभीर इजा झाली.तसेच पोलीस जमादार भालचंद्र मांडवकर यांचा हात फ्रॅक्चर झाला. या दोघांनाही प्रथम मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये हलविण्यात आले. परंतु प्रथमेशची हालत गंभीर असल्याने त्याला तिथून नागपूर येथे हलवण्यात आले.तर पोलीस जमादार भालचंद्र मांडवकर यांना वणी येथे रेफर करण्यात आल्याची माहिती आहे. सदर घटनेचा तपास मारेगाव पोलीस करीत आहे.
