मारेगाव तालुक्यातील मजरा येथील घटना
भास्कर राऊत मारेगाव
जीवनाला कंटाळलेल्या युवकाने विषाचा घोट घेऊन आपले जीवन संपवली.सदर घटना मारेगाव तालुक्यातील मजरा येथे घडली. विष घेऊन आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव रुपेश शामसुंदर आत्राम वय अंदाजे 32 वर्ष असे आहे.
रुपेश हा मारेगाव तालुक्यातील कुंभा येथील रहिवासी होता. मागील दोन ते अडीच वर्षांपूर्वी तो तालुक्यातीलच मजरा या गावी आपल्या आईच्या माहेरी राहायला आला होता. तिथे तो रोज मजुरी आणि इतर कोणतेही काम करून आपली उपजीविका करायचा.
दोन वर्षांपूर्वीच त्याच्या वडिलांचे निधन झाले होते. रुपेशचे लग्न बुटीबोरी येथील एका युवतीशी झाले होते. पाच ते सहा महिन्यांपूर्वीच त्याचा आणि त्याच्या पत्नीचा घटस्फोट झाला. यामुळे तो विमनष्क अवस्थेमध्ये राहायचा. अशातच त्याने दिनांक 9 ऑक्टोबरला मार्डी येथे चौकामध्ये दुपारच्या सुमारास विष घेतले.
ही गोष्ट काही लोकांना माहीत होताच त्याला त्याचे नातेवाईकांचे मदतीने मारेगाव येथील ग्रामीण रुग्णालय येथे दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला वणी येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात आई असून त्याचेवर दि. 10 ऑक्टोबरला मजरा येथे अंत्यविधी करण्यात आला.
