वेगाव – डोंगरगाव शिवारातील घटना
मारेगाव तालुका प्रतिनिधी:- धनराज खंडरे,
कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मारेगाव तालुक्यातील डोंगरगाव वेगाव शिवारात घडली.आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव संतोष लटारी धोटे वय 40 असे आहे.
संतोष धोटे यांच्या वडिलांनी संतोषला वाहितीसाठी आणि उपजीविकेसाठी दोन एकर शेती दिलेली होती. या दोन एकराच्या शेतीच्या भरोशावर ते आपला आणि आपल्या कुटुंबाचा गाडा हाकत होते.अशातच बेभरोशाचा पाऊस आणि वातावरण यामुळे त्यांच्या शेतीमध्ये सतत नुकसान होत होते.
सततचा ओला आणि कोरडा दुष्काळ त्यामुळे त्यांच्या शेतीमध्ये म्हणावे तसे उत्पन्न होत नव्हते.त्यामुळे संतोष हा कर्जात बुडालेला होता. जीवन कसे जगायचे शेतीचा खर्च कसा भागवायचा या विवंचनेत मागील अनेक दिवसांपासून संतोष होता.त्यामुळे जीवनाला वैतागलेल्या संतोषने आपल्या शेतामधील झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
ही घटना दि. 10 ऑक्टोबरला सायंकाळच्या सुमारास उघडकीस आली.संतोषला म्हातारे आईवडील आणि पत्नी तसेच एक मुलगा आणि एक मुलगी असा आप्त परिवार आहे. संतोषवर वेगाव येथील निर्गुळा नदीच्या काठावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
